औरंगाबाद : हिंदू धर्मात सर्व सण-उत्सव तिथीनुसार साजरे केले जातात मग शिवजयंती तारखेनुसार का साजरी करायची ? असा परखड सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित करीत शिवरायांची जयंती वर्षाचे 365 दिवस साजरी केली तरी हरकत नाही असे स्पष्ट केले. महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे क्रांती चौकात शिवजयंतीनिमित्त शिवपुजन आता सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
मनसेप्रमुख राज ठाकरे तसेच युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शिवपुजन करण्यात आले. यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन, अभिजीत पानसे, जावेद शेख, जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे, राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे, सुमीत खांबेकर, आशिष सुरडकर, सतनाम सिंग गुलाटी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी शिवरायांची जयंती ही तिथीनुसारच साजरी केली जावी असे स्पष्ट केले. हिंदू धर्मातील सण -उत्सव तिथीनुसार साजरे केले जात असतील तर राजांची जयंती तारखेनुसार का साजरी केली जावी ? असा सवाल त्यांनी केला. खरेतर शिवरायांची जयंती वर्षातले 365 दिवस साजरी करावी, त्यामुळे आपल्याला शिवरायांचे कर्तृत्व समजेल असेही ते म्हणाले. सायंकाळी शहरात भव्य शोभायात्रा काढावी कोणतेही गालबोट लागू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याने शिवजयंती उत्सवाची मनसेने जोरदार तयारी केली होती. क्रांती चौकात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. त्याच बरोबर रायगडाची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली होती. उत्सवाला पारंपरिक झळाळी यावी म्हणून आकर्षक पद्धतीने भालदार-चोपदार यांची मांडणी व्यासपीठावर करण्यात आली. पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत व्हावे यासाठी सनई चौघड्याच्या व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी दहा वाजेपासून मनसे कार्यकर्ते क्रांती चौकात जमा होण्यास सुरुवात झाली. ढोल पथकांचे तसेच लेझीम पथकाने आकर्षक सादरीकरण सुरू केले. तसेच मैदानी खेळ दांडपट्टा, तलवारबाजी, मल्लखांबाचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. मनसेच्या झेंड्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न यावेळी मनसैनिकांनी केला. सुमित खांबेकर, वैभव मिटकर, संकेत शेटे, आशिष सुरडकर, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी यांच्यासह आधी मनसे पदाधिकार्यांनी यावेळी उपस्थिती होती.
ढोल पथक -वाद्य पथकांनी आणली रंगत
दरम्यान, मनसेच्या शिवपूजन सोहळ्यात ढोल पथक, वाद्य पथक, लेझीम पथकाने चांगलीच रंगत आणली. कोल्हापूरच्या जय हिंद मंडळाने विविध मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. दांडपट्टा चालविणे, तलवारबाजी, भालाफेक, काठ्यांचे प्रात्यक्षिक आकर्षणाचे केंद्र ठरले. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले होते. संभाजीनगर वाद्य पथक, शंभुनाथ वाद्य मंडळ नाशिक मृत्युंजय क्रीडा मंडळाने आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. या सर्व वाद्य पथकांनी क्रांतीचौक परिसर दणाणून गेला होता.